Gandhi _maharashtra times

*दै.महाराष्ट्र टाईम्स-नागपूर आवृत्तीचे संपादक,जेष्ठ व्यासंगी पत्रकार श्रीपाद  अपराजित यांचा " अपूर्ण   अस्तित्वाचे दुःख ! " या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला.      "परिवर्तन घडवितानाही वर्तनातील घसरण टाळणारे,ब्रिटिशांना देशाबाहेर घालवितानाही कटुता प्रतिबिंबित होऊ नये यांची काळजी घेणारे, आपल्या प्रार्थना कक्षेत दूराग्रहींनाही प्रवेश देणारे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या वर्तनातून आदर्श वस्तुपाठ घालून दिला हे केवळ देशपातळीवरच नाही तर जागतिक पातळीवर सर्वश्रृत असताना, राष्ट्रपित्याच्या स्मृतिदिनी त्यांच्या गतप्राण  सावलीचेही भय वाटणार्‍या, कटरवाद्यांनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून 'रक्त' सांडविण्याची  मानसिक क्रौर्याची  परिसीमा गाठणारी विकृती या देशात अद्यापही जीवंत आहे यांचे दर्शन घडवावे या सारखी या देशातील दुर्देवी शोकांतिका नसावी " असे लेखात नमूद करून, या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण भाष्य करणार्‍या या लेखाचा गोषवारा असा :—*
             महात्मा गांधी या देशाचे नेते जसे आहेत तसेच  ते हिंदू समाजाचेही सर्वात मोठे नेते ठरतात.हिंदू धर्म चौकटीतून बाहेर न पडल्याची बोच गांधींजींना होती.कोणी,कुठे,आणि कुणासोबत खावे या नियमांभोवतीच हिंदू धर्म अडकून पडणार असेल तर  धर्मांचे प्राण संकटात सापडण्यास वेळ लागणार नाही असे रोखठोक मत गांधींजींनी त्यावेळी व्यक्त केले होते.गोहत्या करणारे अज्ञानी आहेत,त्याना मारून टाकल्याने अज्ञान दूर होणार  नाही,तर त्यांना सहानुभूती आणि प्रेमाने समजवावे यावर   त्यांचा कटाक्ष होता.त्यासाठी  त्यांनी गोपालनाचा आग्रह धरला होता.त्यांचा हा सल्ला  गोरक्षा शब्दाचा खूप वेळा उच्चार करणार्‍या हिंदूधर्माभिमानी, गोभक्तानी अंमलात आणल्याचे  दिसत नाही हीच मंडळी मात्र गोसेवेची तेवढीच उपेक्षा करतात असे खडेबोलही गांधीनी वेळोवेळी सुनावले होते.मी सनातनी हिंदू आहे असे शंभरदा म्हणणार्‍या   गांधीच्या वागणुकीत सर्वधर्म समभावाचे हजार प्रयोग दडले होते.मी धर्मनिष्ठ असलो तरी देशातील सरकार कुणासोबतही धार्मिक  भेदभावाविना समान व्यवहार करणारे असावे असे मत गांधी व्यक्त करताना आढळत  होते.आम्हीच सर्वाधिक सहिष्णू असल्याचा धर्माभिमान बाळगणार्‍यांना गांधीजींनी केव्हाच माफ केले होते.गांधीजींना हिंसामुक्त धर्म हवा होता.देवालयांमधील अंधश्रद्धेविरोधांत आपण  काही करू शकत नाही ही असहाय्यता गांधीजींना डसत होती.गांधीजींना परोपकारी,  कनवाळू, समाज हवा होता.  हत्येच्या आणि त्यासारख्या लांछनास्पद कृत्यांनी मानव  समाजाचे,धर्माचे किंवा खर्‍या  सुसंस्कृतीचे पाऊल पुढे पडायला मदत होत नाही ही त्यांची भूमिका होती.  कुणाचाही जीव घेण्याच्या विचारांचा त्यांनी कायम विरोध केला.स्वतःमधील  पापवृत्तीवर मात करणे आणि भल्याला त्याच्या योग्य स्थानी  पुनर्स्थापित करणे गरजेचे आहे.हा विजय कसा मिळवावा हे धर्म शिकवत नसेल तर तो धर्म खर्‍याअर्थाने आपल्याला काहीच शिकवत नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते.
          देशाच्या विभाजनाचे खलनायक म्हणून गांधीजींना विरोधकाकडून हिणवले गेले. स्वातंत्र्य आंदोलनाच्या अखेरच्या पर्वातील घडामोडींचा क्रम लक्षात घेतला तर गांधीद्वेषातून विरोधकांनी हेतुपुरस्सर हवी तशी मांडणी केल्याचे तथ्य  उजेडात येते.आपल्या विचाराचे लाखो विरोधक या देशात आहेत यांची जाणीव गांधीजींना होती.पण गांधीजींनी मात्र आपल्या आचरणांतून  कट्टर विरोधकांचाही आदर कसा करावा हे शिकवले होते.गांधी समजून घेताना खरेतर सर्वकष बाजू विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते.एकांगी किंवा  स्वतःला उपयोगी पडेल असा विचार करता येणार नाही.  पण गांधीजींचा पराकोटीचा द्वेष करणारी मंडळी या देशात आहेत व त्यांचा   गांधीद्वेष वेळोवेळी उफाळून येत असतो.यांची प्रचिती उत्तर प्रदेशमधील अलीगडच्या घटनेने पुनश्र्च निदर्शनांस आली आहे.
            अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडे  या आपल्या सहकार्‍यासमवेत दरवर्षी महात्मा गांधींच्या स्मृतिदिनी शौर्यदिन साजरा करतात.यापूर्वीही त्यांनी  नथुराम भक्तीचे प्रदर्शन केले होते.नथूराम गोडसेंच्या आधी जन्माला आली असती तर मीच गांधीची हत्या केली असती असे वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या पूजा शकून पांडे यांनी यावर्षी राष्ट्रपित्याच्या स्मृतिदिनी महात्मा गांधीच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडून, प्रतीकात्मक रक्त सांडविल्यानंतर ,त्यांचा पुतळा पेटवून दिला. लांच्छनास्पद व निंदनीय ठरणार्‍या,व सार्‍या देशाला  हदरवून टाकणार्‍या या घटनेने,पुतळ्याला गोळ्या झाडून 'रक्त'सांडवून, मानसिक क्रौर्याची परिसीमा गाठू शकणार्‍या, मानसिक विकृतीचे दर्शन घडविले आहे.जगातील द्वेषाचा अंत व्हावा या आंतरिक इच्छेतून सदैव वावरणार्‍या गांधींच्या  वाट्याला त्यांच्या अनैसर्गिक  मृत्यूनंतरही इतकी घृणा यावी यांचे सखेदाश्र्चर्य वाटते.
                     मृत्युपश्यात विश्ववंदनीय होण्याची गांधी  विचाराची गती थोपविता येत   नसल्याने कोपिष्ट झालेले  कट्टरवादी मात्र गांधीसोबतचे शस्रुत्व  सोडायला तयार नाहीत. अलीगडच्या घटनेमागे हीच मानसिकता दडली आहे.गांधीजींच्या  गतप्राण सावलीचे भय कट्टरवाद्यांच्या जगाला आहे असा संदेश देणारी ही अलीगडची घटना ठरते.  परस्परांचा आदर करणारा समाज म्हणून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे यांची जाणीव या घटनेने करून दिली आहे.ठराविक समूहाची ही कृती हे सर्व समाजाचे प्रतिबिंब आहे असे  समजायचे कारण नाही.मात्र गांधीजींची व्यक्तिगत धारणा  अवलंबायची ठरवली तर सभ्य,सदाचारी,सुसंस्कृत समाज आपण अजूनही घडवू शकलो नाही हे तथ्य जड अंतःकरणाने स्वीकारावे लागणार आहे. संपादक,जेष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांनी लेखात केलेले हे अभ्यासपूर्ण भाष्य सूज्ञ वाचकांना खरोखरच अस्वस्थ व अंतर्मुख करणारे ठरते हे मात्र तितकेच खरे !—————————पत्रकार अरूण दीक्षित.  खोपोली.    ४/२/२०१९                     (९४२२६९४६६६/८१६०१०५९४०)

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510