सृजन
👁️🌴👁️
🌿☘🍀🍂🍃🌺🌹☘
*सृजन*
यमाई औंध,राजेंद्र गुरव
____________________________________________
* मानवी मन स्पंजसारखे असते. जीवन पथावर मनाला जे भावते, ते ते शोषून घेत ते पुढे चालत रहाते. जीवन विविध अंगाने सामोरे येते.कधी सुखावते, कधी बोचते ... कधी खरचटते, कधी आत रुतून बसते, कधी आरपार निघून जाते.जीवनाचा आस्वाद वेगवेगळ्या अनुभूती देतात. वेगवेगळ्या अनुभूती विचारांना गती देत असतात. अनुभूतींचा परिणाम संवेदनावर होत राहतो. संवेदन मनावर उमटत राहतात. कधी निःशब्द तर कधी व्यक्त होतात. यामधूनच विविध कला व्यक्त होतात. त्यांचे प्रकार उदयाला येतात.*
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यात कुणाला चैतन्य दिसतं, भिरभिरणाऱ्या वाऱ्यात कुणाला गाणं ऐकू येत, उगवणाऱ्या सूर्यात कोणाला आशेचे किरण दिसतात, विशिष्ट जागच्या नेहमीच्या दगडात कोणाला आसरा सापडतो अनं सवयींच्या मानसात निवारा... '
*माणसाच्या भावभावनांच्या खेळातून ,मंथनातून कला उदयाला येते . कधी जीवनाच्या रणकंदनातून तावून सुलाखून जन्माला येते कधी मलमली स्पर्शाने जीवनाचे गीत गाते.*
या भावभावनांचे अमूर्त संचित काव्य, शिल्प, नाट्य, नृत्य,काष्ठ,छाया,रंग,चित्र .साहित्य,गायन-वादन इत्यादी अनेक रुपांनी प्रकट होत असते, जीवनात मूर्तीमंत होत असते. विविध कला माणसाच्या भावभावनांचे व्यक्त रूप आहे, हे निश्चित!*
*काम, क्रोध ,मद, मोह ,मत्सर,दंभ विविधा षड्रीपु ,सुखदुःख त्याचे आवेग माणसाच्या विविध आत्मिक प्रतिसादाला जन्म देतात.*
*काही संवेदनशील माणसं या आपल्या आवेगांना विविध रुपात व्यक्त करतात,अमूर्त भावनेला कलेचे मूर्तरूप देऊन जातात*
*एखादाकलाकार शिल्पातून व्यक्त होतो. एखादा चित्रकार चित्रकलेत जीव ओततो. एखादं काव्य जन्माला येतं कारण हृदय तीरावरती कुठलातरी भाव रुजलेला असतो*
*उस्फूर्त निर्मिती रूजलेल्या विचारांचे देणं होऊन जात! नेहमीच्याच जीवन जंगलात, लाकूड फाट्यात लपलेले चेहरे भाव-भावना काष्ट शिल्पकाराला आव्हान देतात. कलाकारांऱ्या शोधक संवेदनशील नजरेतून काष्ट ,चित्र,शिल्प,गाणं ,अक्षरलेणी.. नवनिर्मीती उदयास येतात. संगीतकाराच्या हृदयाने छेडलेली एखादी बीट ,संगीत होऊन जन्माला येते. काव्य आणि संगीत एकत्र येऊन काव्यानंद निर्माण होतो.*
*चौसष्ट कलांचा नेहमीच उल्लेख केला जातो आणि मग जाहिरात ६५ वे रूप घेऊन येते. अशा अजूनही अनेक कलां गिणतीचा अभिनिवेश न बाळगता जन्माला येत राहतात. *
*कलेची उत्पत्ती ही कलाकाराच्या सृजनाचं, त्याच्यातील सृजनशक्तीच देणं असतं! कधीकधी कलाकाराच्या मनातील द्वंद्व ही कलेत उतरतं. आनंदाबरोबर त्याच्या मनातील नैराश्यही ,राग,द्वेष -प्रेम, इ. प्रकट करते . जणू त्याच्या भावभावनांचे विश्व, कलाकृतीचे बोट धरून नव्यानंजन्माला येतं*.
*कला ही धर्म,पंथ भाषा,प्रदेश वा इतरभेदांच्या पलीकडे गेलेली असते आणि खऱ्या रसिकाला ती अशीच भेदाच्या भिंतीच्या पलीकडे घेऊन जाते.*
* कलेचा विस्तृतपट कधी परंपरा, संस्कृतीबरोबर अखंड इमान राखतो. शास्त्रीय संगीतातील अनेक घराणी आणि त्यांच्या चालत आलेल्या परंपरा पाहिल्या की शास्त्रीय संगीताचं विस्तीर्ण जग आपल्याला अनुभवायला मिळते. परंपरा आणि भीष्माचार्य कलाकार कलेचे राजदूत असतात. परंपरात भूतकाळाच्या खूणा दिसतात. मोठ्या कलाकारांच्या सानिध्यात कलेचा परिसस्पर्श लाभतो. त्यांच्या सावलीत कलेच्या विराट रूपाचं दर्शन घडत राहते*
*कला ही ईश्वरी देणे आहे ,नक्षत्रांचे लेणे आहे. कला ही विकसित मानवाचं चिन्ह आहे.त्याच्या भाव-भावनाचे परिमार्जन आहे. भावभावनांच्या उन्नतीचे लक्षण आहे.
कला माणसाच्या जीवनाचे सार आहे आणि आपलं जगणं आणखीन उदात्त, उन्नत, उत्तम करण्याचा विचार आहे.*
🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०
☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
सुंदर शब्दात वृत्तांकन
ReplyDelete